
गावदेवी मार्केटमध्ये १५५ गाळे आहेत. फळे व भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या या मंडईत मोठ्या संख्येने रेडीमेड कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. या मंडईत काही समाजकंटकांमुळे दहशतही पसरवली जात होती. तर प्रवेशद्वाराचा कब्जा बेकायदा फेरीवाल्यांकडून घेण्यात आला होता. मार्केटच्या दोन बाजूंच्या भिंतीभोवती बेकायदा टपऱ्या टाकल्या गेल्या. या प्रकाराविरोधात सातत्याने महापालिका व स्थावर मालमत्ता विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आगीची दुर्घटना घडली, असा आरोप संजय वाघुले यांनी केला.
ठाणे, दि. 22 (प्रतिनिधी) : मार्केटमधील अतिक्रमणे, बेकायदा फेरीवाल्यांचा प्रवेशद्वारावर कब्जा, स्थावर-मालमत्ता विभागाच्या संगनमताने मार्केटभोवती उभारलेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे गावदेवी मार्केटमध्ये आगीची दुर्घटना घडली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आज येथे केला. या आगीबाबत सर्वप्रथम माहिती मिळाल्यानंतर संजय वाघुले यांनी तातडीने अग्निशमन दलाबरोबर संपर्क साधला होता.
गावदेवी मंडईतील मूळ विक्रेते हे बेकायदा विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे हैराण झाले होते. बेकायदा विक्रेत्यांनी प्रवेशद्वाराचा कब्जा घेतला होता. तसेच त्यांच्याकडून मार्केटमध्ये सामानही ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या अतिक्रमणांकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च २०२६ रोजी संजय वाघुले यांनी तक्रार केली होती. तसेच आगीचा धोकाही व्यक्त केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गावदेवी मार्केटमध्ये चार बाजूंपैकी दोन बाजू दुकानांमुळे बंद झाल्या. उर्वरित दोन भिंतीवर केवळ छोटी लोखंडी जाळी बसविण्यात आली. त्यामुळे हवा खेळती राहत नव्हती. मार्केटमध्ये वावरताना ग्राहक घामाघूम होत होते. तर दोन बाजू बंद असल्यामुळे आग धुमसत राहिल्यानंतर खूप वेळानंतर माहिती मिळाली. तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते, असे संजय वाघुले यांनी सांगितले.