
ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ला महापालिकेकडून सर्व अधिकार देण्यात आले आहेत. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापले आहे. “असा कोणता साप आहे, ज्याच्या शेपटीवर आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली?” असा संतप्त सवाल करत ठाण्यात लोकशाहीचा मुडदा पाडला जात असल्याची टीका पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, परवानगी नाकारली तरी आपण मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक मिलिंद बनकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम आणि सचिन पंधरे उपस्थित होते.
# खासगी कंपनीला अधिकार देण्याचा कट
डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार होता. ठाणे शहरातील विकासकामांची धोरणे ठरवण्याचे अप्रत्यक्ष अधिकार एका खासगी कंपनीला देण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप मनोज प्रधान यांनी केला. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतचे निर्णय सदर कंपनीच घेणार असल्याने महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. हा प्रकार महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान करणारा आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारा आहे, असे ते म्हणाले.
# पोलीस प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप
मोर्चाच्या आयोजनाबाबत शुक्रवारी दुपारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पत्र देण्यात आले होते. परंतु, सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या स्वाक्षरीने १ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचे सांगत परवानगी नाकारण्यात आली. “वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्लस्टर कंपनीच्या माध्यमातून गोळीबार केला जात आहे. पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे त्यांनी जाहीर करावे,” असे आव्हान प्रधान यांनी दिले.
# ठाणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
या मोर्चाच्या माध्यमातून शहरातील मूलभूत प्रश्नांना हात घातला जाणार होता. “४ हजार एकरवर होणाऱ्या बांधकामासाठी १२.५ चा एफएसआय (FSI) कोणत्या आधारावर दिला जात आहे? किती घरांची निर्मिती होणार, लोकसंख्या किती वाढणार आणि त्यांना पाणीपुरवठा व मलनिस्सारणाची सोय कशी पुरवणार?” असे प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केले. या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नयेत म्हणूनच मोर्चा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कंपनी सत्तेच्या जोरावर हुकूमशाही पद्धतीने काम करत असून पोलिसांच्या मदतीने लोकशाहीचा खून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.कशाहीचा खून करीत आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष सहन करणार नाही, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.