
ठाण्यातील देवश्री गार्डनमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू
ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेतील आमदार अॅड. माधवी संजय नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरापासून राजकीय प्रवास आणि संघटनात्मक कार्य सुरू करणाऱ्या अॅड. माधवी नाईक यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाईल, असा विश्वास व्यक्त करीत रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
भाजपतर्फे विधान परिषदेच्या सदस्यपदी अॅड. माधवी नाईक यांची निवड करण्यात आली. अॅड. माधवी नाईक यांनी ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या ठाण्याच्या रहिवाशी असल्यामुळे त्यांनी ठाण्यातील ऋतू पार्कजवळील देवश्री गार्डन संकुलात जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवक-नगरसेविकांची उपस्थिती होती.
भाजपची साधी कार्यकर्ती, नगरसेविका, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते आमदारपदापर्यंत अॅड. माधवी नाईक यांचा राजकीय प्रवास पोचला आहे. भाजपच्या राज्यभरातील संघटनात्मक बांधणीमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागतील, असे नमूद करीत प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.

शेकडो स्नेहींकडून शुभेच्छा
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार अॅड. माधवी नाईक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आमदार अॅड. माधवी नाईक यांच्या ३० ते ३५ वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील वाटचालीच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक आणि स्नेहीजनांची उपस्थिती होती.