
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्काराचे वितरण
ठाणे 08th March : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रणरागिणी सायकल राईड रविवारी महापालिका भवन येथे संपन्न झाली. रंगीबेरंगी वेशभूषा, सजवलेली सायकल, महिला दिनाचे विविध संदेश देणारे फलक, पुरस्कार सोहळा, मान्यवरांची उपस्थिती असे या राईडचे वैशिष्ट्य होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महिला या प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत, भविष्यात त्यांनी असेच पुढे जात आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात , त्यावेळी त्यांच्या पाठी पुर्ण कुटुंब असते असे सांगून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला या आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही, पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनचे उपक्रम हे स्तुत्य असतात. मी आणि ठाणे महापालिकेच्यावतीने त्यांना आवश्यक ती मदत भविष्यात करु असे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केले.
३.५ आणि ५.५ किमी अंतर अशा दोन वेगवेगळया गटांत ही सायकल राईड आयोजित करण्यात आल्या होत्या.. सकाळी ७. १० मिनिटांनी ३.५ किमी अंतराच्या तर ७.३५ मिनिटांनी ५.५ किमी अंतराच्या राईडला सुरूवात झाली. सुप्रसिद्ध आयुर्वेद स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या प्र.उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते हिंदायान राईडचे संस्थापक विष्णूदास चापके, आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून सायकल राईडला सुरूवात झाली.

त्यानंतर रणरागिणी पुरस्कार सोहळ्यास सुरूवात झाली. वयाच्या ६८ वर्षामध्येही सायकलिंगमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या मंगला पै यांना रणरागिणी जीवन गौरव, डॉ. मधुरा कुलकर्णी यांना रणरागिणी गौरव, सविता ननोरे या ज्येष्ठ महिला आणि अपुर्वा फर्डे या चौथीत शिकणाऱ्या मुलीला रणरागिणी पुरस्काराने तसेच, सीमा कुळकर्णी, आनंदी भोसले यांना मातृत्वाचा पुरस्काराने महापौर पिंपळोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दृष्टीहीन असतानाही तीन हजार किमीपेक्षा अंधिक अंतराची सायकलिंग करणाऱ्या अपर्णा अग्रवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या सायकलपटू तर आहेतच मॅरेथॉन धावपटू आणि उदयोन्मुख लाइफ कोच आहेत. त्यांच्या बॅरियर्स बस्टर या पहिल्या पुस्तकाबदद्ल त्यांनी माहिती दिली.