
ठाणे (31) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून एक तर उपमहापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून एक असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती महापालिका सचिव मनीष जोशी यांनी दिली. शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांनी उपमहापौर पदासाठी (30 जानेवारी 2026) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह पक्षाचे गटनेते, नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
महापौर व उपमहापौर पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वा. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे.