
ठाणे (12) – आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह रहावी, यासाठी ईव्हीएम (Electronic Voting Machine) मशीन तैनात करण्याची (सील) करण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
दिनांक 9 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत ईव्हीएम मशीनचे कमिशनिंग, तपासणी व सीलिंग हे काम प्रभाग समितीनिहाय निश्चित केलेल्या केंद्रांवर करण्यात आले असून, या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक ईव्हीएम मशीनची कार्यक्षमता तपासून त्यानंतर अधिकृत सील लावण्यात आले आहे.
सील करण्यात आलेली ईव्हीएम मशीन कडक बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, 24 तास पोलीस बंदोबस्त व प्रवेश नियंत्रण व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणारी प्रत्येक ईव्हीएम मशीन पूर्णतः सुरक्षित व विश्वासार्ह राहील, याची दक्षता घेतली जात आहे.
निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी प्रशासनाकडून सर्व टप्प्यांवर पारदर्शकता पाळण्यात येत असून, ईव्हीएम सीलिंगची ही प्रक्रिया निवडणूक तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
Photo : Internet