
ठाणे (23 Dec ) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती अंतर्गत ‘प्रसारमाध्यम निरीक्षण कक्ष’ महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाची पाहणी आज निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी केली व या कक्षामार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिताली संचेती, नोडल अधिकारी तथा प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपस्थित होते.
या समिती मार्फत निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांचेकडून प्रसारित, प्रसिध्द करावयाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे, प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे काम करण्यात येणार असून या कक्षात काम करत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करावे अशा सूचना निवडणूक अधिकारी तथाआयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
आचारसंहिता कालावधीत सर्वच घटकांनी आदर्श आचारसंहिता नियमावलीचे पालन करावे व प्रसारमाध्यमांनीही सर्वांना समान न्याय या तत्वावर आचारसंहितेस अनुसरून वस्तुनिष्ठ वृत्ते प्रसिध्द करावीत तसेच मतदारांनी मतदान करण्यासाठी माध्यमातून प्रयत्न करावेत, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले.