
ठाणे (08) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभ येथे नवीन जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे कोलबाड परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाणी पुरवठा वाहिनी बाधित होत असल्याने ही जलवाहिनी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. या ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी स्थलांतराचे काम सोमवार दि. १० नोव्हेंबर, २०२५ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे, सोमवार दि. १० नोव्हेंबर, २०२५ रोजी स. ९.०० ते मंगळवार दि. ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत असे एकूण २४ तास या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील सिध्देश्वर तलाव परिसर, माता रमाबाई आंबेडकर नगर, गणेश वाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, हंस नगर, सिंग नगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदास वाडी, कोलबाड, गोकुळ नगर परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका मुख्यालय परिसर, चरई, धोबीआळी इ. भागात २४ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.