
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते सन्मान
ठाणे (01 Nov. 2025 ): मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की, आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे, त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपण घेतली पाहिजे ती उराशी बाळगली पाहिजे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे, त्यासाठी आपली मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी वाड्मय वाचविण्यासाठी संघर्ष करायचा आहे, यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये लोकसहभागातून किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले गेले पाहिजे असे प्रतिपादन सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी आज ठाण्यात केले.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमास राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकुरकर, अभिनेते सागर तळाशीकर, कवी दुर्गेश सोनार, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचं संवर्धन करणे हा उठाव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा या बंद पडता कामा नये. मराठी शाळेतील कोणत्याही वर्गात एक विद्यार्थी असेल, तरी त्या विद्यार्थ्याला शिकवले पाहिजे. मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे. त्यातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर घडतील असे विश्वास पाटील यांनी नमूद केले.
ठाणे महानगरपालिकेकडे आम्ही महानगरपालिकेपेक्षा आम्ही नगरपालिका म्हणून पाहतो कारण गीतकार पी.सावळाराम या नगराचे पहिले नगराध्यक्ष होते असे सांगत पी.सावळाराम यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तसेच शासकीय नोकरी करत असताना अनेकदा मामलेदार मिसळची चव चाखली असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

साहित्य, विचार आणि नात्यांचा उत्सव असतो. शहराचा विकास पूल रस्ते बांधून होत नाही, तर त्या शहरातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वमुळे शहराला वलय प्राप्त होते, ठाणे शहरातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीमत्वामुळे ठाणे शहराला हे वलय प्राप्त झाले आहे, असे ठाणे महापालिकेचे अतिरिकत् आयुक्त संदीप माळवी नमूद केले. ठाणे महापालिका साहित्य – सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मागे उभी असते, यापुढेही महापालिका साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमात आपले योगदान देत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रा. कविवर्य अशोक बागवे यांच्या प्रस्तावनीय आणि कवी दुर्गेश सोनार यांनी कवी सतीश सोळांकूरकर यांच्या कवितांचे रसग्रहण सोळा अंकुरांचे ललित्य या संग्रहाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र कोंडे यांनी केले.