
➤ महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश
➤ केंद्र शासनाच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत 43 दवाखाने सुरू
➤ राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत 12 दवाखाने सुरू
➤ आणखी 25 दवाखाने सुरू करण्याचे नियोजन
ठाणे (27) : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुमारे पावणे तीन कोटी रुपयांची बँक गॅरंटी तसेच, मे महिन्यापासून या कंपनीला देय असलेली रक्कम अशा दोन्ही रकमा ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत. आवश्यकतेनुसार त्या रकमांमधून आपला दवाखानासाठी नेमण्यात आलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार, जागांचे भाडे अदा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुस्पष्ट निर्देश दिल्याची माहिती उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी यांनी दिली आहे.
त्याचबरोबर, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात, महापालिकेच्या 33 आरोग्य केंद्रांच्या जोडीने, केंद्र शासनाच्या योजनेतून नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत 43 दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. तर, राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत १२ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे या योजनेत आणखी 25 दवाखाने नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहितीही उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.
‘आपला दवाखाना’ या उपक्रमाबाबत गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून सातत्याने वृत्त येत आहेत. त्यात, हा उपक्रम बंद करून, कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी यांचे पगार थकले असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भात, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. उपायुक्त उमेश बिरारी यांनी या पत्रकार परिषदेत या संपूर्ण उपक्रमाची वस्तुस्थिती विशद केली. त्यावेळी, महापालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे उपस्थित होत्या.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महासभा ठराव क्र.२३, दि. २१/०६/२०१९ अन्वये निविदा प्रक्रिया राबवून ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यासाठी मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि या कंपनीची निवड करण्यात आली. दि. ३१/०७/२०२० रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे. यासंदर्भात, ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय आरोग्य अधिकारी व मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि या दोन पक्षांमध्ये करारनामा करण्यात आलेला आहे. या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि. यांनी शहरामध्ये एकूण ५० दवाखाना सुरू करणे आवश्यक होते. सदर कार्यादेश अन्वये डिसेंबर २०२० मध्ये पहिल्या टप्प्यात ०६ ठिकाणी आपला दवाखाना केंद्र सुरू करण्यात आले. परंतु, संपूर्ण करार कालावधीत सदर संस्था केवळ ४६ दवाखाने सुरू करू शकली. ही वस्तुस्थिती आहे. ‘आपला दवाखाना’ यांना कार्यादेश अंमलबजावणी दिनांकापासून (०१/०८/२०२० ते ३१/१०/२०२५) कालावधीकरिता म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थात, हा आदेश पारित केल्यानंतरही दि. १४/०८/२०२५ पासून आजपर्यंत संस्थेने एकही दवाखाना चालू केलेला नाही.
या दवाखान्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी जसे की, जागेकरीता येणारे भाडे, पाणी, वीज देयके, इंटरनेट कनेक्शन, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, औषधे, इतर सामुग्री उपलब्ध करुन देण्याची संपूर्ण जबाबदारी करारानुसार मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा.लि यांची आहे. तसेच, प्रत्येक आपला दवाखान्यामध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, संबंधित कर्मचान्यांचे व सहकाऱ्यांचे वेतन अदा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांचीच आहे.
आपला दवाखाना येथे तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिरुग्ण रु. १५०/- प्रमाणे महापालिकेमार्फत देयके अदा करण्यात येत आहे. संस्थेने सुरक्षा अनामत म्हणून सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामधून रु. २,८९,०२,८००/- ची बॅंक गॅरंटी महापालिकेकडे जमा केलेली आहे. सदर बॅंक गॅरंटी दिनांक २१/१०/२०२६ पर्यंत ग्राह्य आहे.
संस्थेने आता त्यांच्या आपला दवाखानामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी यांना किती वेतन देण्यात आले आहे, याचा तपशील महापालिकेकडे सादर केलेला आहे. त्याची शहानिशा करून एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या काळातील थेट कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अदा करण्याबाबत महापालिका निर्णय घेईल. त्यासाठी संस्थेची पावणे तीन कोटींची बॅंक गॅरंटी व देयकांची रक्कम महापालिकेकडे आहे. त्यातून, सन्माननीय लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांनुसार वेतन अदा करण्यात येईल, असेही उपायुक्त उमेश बिरारी यांनी स्पष्ट केले.
➤ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे
15 व्या वित्त आयोगाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात 68 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ४३ आरोग्य मंदिरे कार्यान्वित झालेली आहेत. ही आरोग्य केंद्रे सकाळी 9:30 ते दु. 4:30 या काळात सुरू असतात.
नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे – धर्मवीर नगर, आनंद विहार सोसायटीजवळ, दामिल नाका, अमिनाबाद एसटीपी प्लॉटजवळ, भारत गिअर कंपनीजवळ, गायमुख, कृष्णा नगर, कोपरी पूर्व शाळा क्र. ३४, बारा बंगला प्रवेशद्वार, शास्त्रीनगर, फुलपाखरू उद्यानासमोर, जयभीम नगर-१, कळवा -९० फूट रोड, उथळसर प्रभाग समिती कार्यालयामागे, कासारवडवली, गावदेवी-मुंब्रा, मिठबंदर, जयभीम नगर-२, बाटा कम्पाऊंड, कोंकणीपाडा, किसन नगर, घासवाला कम्पाऊंड, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, आनंद नगर जकात नाका, वागळे इस्टेट, विटावा, रुपादेवी पाडा, साठे नगर, चांद नगर, पडले गाव, शीळ अग्निशमन केंद्र, खडी मशीन, हाजूरी, कोपरी प्रसुतीगृह, खिडकाळी, आदिवासी उद्यान, आझादनगर, मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह, कोपरी डायलिसीस सेंटर, राबोडी कत्तल खाना, आतकोनेश्वर या ठिकाणी आहेत.
➤ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
राज्य शासनाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत ठाण्यात १२ ठिकाणी दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. हे दवाखाने दु. 2:00 ते रा. 10:00 या काळात सुरू असतात.
दवाखाने – पाचपाखाडी, कासारवडवली, अमिनाबाद-कौसा, खारेगाव, पारसिक बोगद्याजवळ-आतकोणेश्वर, मुंब्रा हिल, रामनगर, येऊर, गणेश नगर, पानखंडा, पातलीपाडा, कोलशेत या ठिकाणी आहेत.