
कोकण व मुंबई प्राधिकरण विभागातील 33 उद्योजकांनी पटकाविले सर्वाधिक 45 पुरस्कार
ठाणे,दि.15 – महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या निर्यातदार उद्योजकांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार- 2025 वितरण सोहळा राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते काल, दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी हॉटेल ताज लँड्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे संपन्न झाला.
राज्यातील एकूण 67 पुरस्कारांपैकी तब्बल 45 निर्यात पुरस्कार एकट्या कोकण आणि मुंबई प्राधिकरण विभागाच्या 33 कर्तृत्ववान उद्योजकांनी पटकावले, हे यश खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आणि प्रेरणादायी आहे.
या राज्यस्तरीय एकूण 67 निर्यात पुरस्कारामध्ये कोकण विभाग व मुंबई प्राधिकरण विभागातील एकूण 33 उद्योजकांना 45 निर्यात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कोकण विभागातून एकूण 21 उद्योजकांना यावर्षी सुवर्ण व रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापैकी ठाणे-14, पालघर-03, रायगड-02 व रत्नागिरी-02 या जिल्ह्यातून निर्यातदार उद्योजकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मुंबई प्राधिकरण विभागातून एकूण 12 उद्योजकांना राज्य निर्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातून हिमल लि. (सुवर्ण), अपार इं.लि. (सुवर्ण), सिमॉसीस इंटरनॅशनल (सुवर्ण), झेनीथ इंडस्ट्रीयल रबर प्रो. (सुवर्ण), ज्योती स्टील इंडिया (सुवर्ण), जी एस एक्स्पोर्ट्स (सुवर्ण), जॅब्झ इंटरनॅशल प्रा.लि. (सुवर्ण), नवकार फॅब (सुवर्ण), तर, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, एच डी फायर प्रो., दुधिया सिंथेटिक्स, फुई गो टेक्स, व दलाल प्लास्टिक्स यांना रजत पुरस्कार तसेच रायगड जिल्ह्यातून असावा इन्शुलेशन प्रा.लि. यांना सुवर्ण तर श्रीकेम लॅब यांना रजत पुरस्कार आणि पालघर जिल्ह्यातून डि डेकोट एक्स्पोट्स, यांना सुवर्ण तर अमीटी लेदर इंटरनॅशनल यांना रजत पुरस्कार तसेच रत्नागिरी जिल्हयातून सुप्रिया लाईफ सायन्सेस व जिलानी मरीन प्रोडक्ट्स यांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
याशिवाय मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातून ॲटलस एक्सपोर्ट (सुवर्ण), बीडीएच इंडस्ट्रिज (सुवर्ण), इलेक्ट्रोफोकस इलेक्ट्रिकल्स (सुवर्ण), ग्लोब कोट्यम (सुवर्ण), लाहोटी ओव्हरसीज लि. (सुवर्ण), इंटरनॅशनल फूटस्टेप्स (रजत), क्रिश्ना अँटीऑक्सीडंट प्रा.लि. (रजत), सिनर्जी लाईफस्टाईल प्रा.लि. (रजत), ले मेरिट लि. (प्रमाणपत्र) पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय एकूण 67 निर्यात पुरस्कारामध्ये कोकण विभाग व मुंबई प्राधिकरण विभागातील एकूण 33 उद्योजकांना 45 निर्यात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी सन 2022-23 आणि 2023- 24 या वर्षांकरिता “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार 2025” चे वितरण मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले.
या पुरस्कार वितरण समारंभात उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, उद्योग सचिव डॉ. पी अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम.देवेंदर सिंह, अतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच कोकण/मुंप्रावि विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ आदी मान्यवर व कोकण/मुंप्रावि विभागातील सर्व महाव्यवस्थापक उपस्थित होते.
निर्यात कॉन्क्लेव्हचे आयोजन करुन एकाच प्लॅटफार्मवर DGFT, CUSTOM, EPC व इतर आवश्यक शासकीय कार्यालये उपलब्ध करुन निर्यातदारांना मार्गदर्शन व त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यात आले, याशिवाय DEPC बैठकांचे नियमित आयोजन करण्यात आल्याचे हे फलित आहे.
कोकण विभागाच्या या अफाट यशामागे विभागीय प्रशासन आणि उद्योग विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अमोल मार्गदर्शन व अथक परिश्रम आहेत, यात शंकाच नाही. कोकण/मुंबई प्राधिकरण विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक तसेच व्यवस्थापक व उद्योग विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शेकडो निर्यातदारांना योग्य दिशा दिली.