
शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक
रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच आजच रात्री, रविवारी सर्व खासदारांना दिल्लीत येण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत.
येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक सोमवार, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बोलावली आहे. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून आणण्याचा चंग डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बांधला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून असून मतदान कसे करावे, काय काय काळजी घ्यावी, अशा सूचना आधीच शिवेसनेच्या सर्व खासदारांना केल्या असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.