
- 117 बांधकामे पूर्णपणे निष्कासित, 34 बांधकामांतील वाढीव बांधकाम हटवले
- 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू
ठाणे (25) : मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १५१ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. १९ जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील २१ इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे. या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, ३४ बांधकामांमधील वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात, १९ जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे.
प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य आहे. आतापर्यंत तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये ११७ बांधकामे पूर्णपणे पाडली आहेत. तर, ३४ या बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहितीही उपायुक्त पाटोळे यांनी दिली.
या मोहिमेची अमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरुपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये, असे मा. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने, ठाणे महापालिका क्षेत्रात महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देशही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच, अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी व बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडीत करण्यात यावे, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळसंयोजन घेतले असल्यास ते तात्काळ खंडीत करावे. तसेच यापुढे पाणीसंयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगी शिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळ संयोजन दिले जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी व यापूर्वी जी नळसंयोजने दिली आहे ती तात्काळ खंडीत करण्यात करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता (१९ जून ते २४ जुलैपर्यंतची आकडेवारी)
- नौपाडा-कोपरी – १०
- दिवा – ४०
- मुंब्रा – २०
- कळवा – १७
- उथळसर – १०
- माजिवडा-मानपाडा – २६
- वर्तक नगर – ११
- लोकमान्य नगर – १३
- वागळे इस्टेट – ०४
- एकूण – १५१