
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि बोलक्या रेषा यांच्या वतीने व्यंगचित्र स्पर्धा
ठाणे, दि. 24 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि बोलक्या रेषा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मे रोजी, जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त “व्यंगचित्र स्पर्धा 2025” चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना व्यंगचित्रणाच्या कला प्रदर्शनाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा या स्पर्धेच्या आयोजनामागे व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देण्याचा आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याचा उद्देश असल्याचे मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी सांगितले.
ही स्पर्धा दोन गटांमध्ये होईल. पहिला गट 12 ते 18 वयोगटासाठी पाणीटंचाई, प्रदूषण, मोबाइलचा अतिवापर हे विषय आहेत, तर दुसरा गट18 वर्षावरील गटासाठी नागरी समस्या, पर्यावरण, बदलते राजकारण असा आहे. एका स्पर्धकाला दोनच व्यंगचित्रे पाठवता येतील. व्यंगचित्रे cartoonist.event2025@gmail.com या ईमेलवर पाठवावी. व्यंगचित्रे पाठवण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025 आहे, तर निकालाची घोषणा २५ एप्रिल २०२५ रोजी होईल. व्यंगचित्रकार दिनानिमित्त होणाऱ्या चित्रप्रदर्शनात स्पर्धेतील निवडक व्यंगचित्रे लावली जाणार आहेत.

स्पर्धेत दोनही वयोगटासाठी व्यंगचित्रकारांना बक्षिसे देण्यात येणार आहे. पहिल्या विजेत्याला ११,००० रुपये, दुसऱ्या विजेत्याला ९,००० रुपये आणि तिसऱ्या विजेत्याला ५,००० रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून व्यंगचित्रकारांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार असून, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्याची संधी उपलब्ध होईल.
बोलक्या रेषा या संस्थेनेही या उपक्रमाला पाठिंबा देत व्यंगचित्रकारांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व व्यंगचित्रकारांना आवाहन करण्यात आले आहे. तुमच्या व्यंगचित्रातून तुमचे विचार मांडा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
: ठाणे रेडिओ