
मुंबई : धनगर जमातीच्या घटनादत्त ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेले दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. १६ मार्च रोजी पुण्यश्लोक मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज आठवा दिवस असून, राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव आझाद मैदानात दाखल होत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या विविध भागांतून समाज एकवटत असल्याचे चित्र दिसत आहे. ST आरक्षणाची अंमलबजावणी आणि प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. “करो या मरो”ची भूमिका घेत हा लढा अधिक आक्रमक करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ दखल घेऊन धनगर समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण असून, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी आझाद मैदानावर भेट देत दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनकर्त्यांना अधिक बळ मिळाल्याचे सांगितले जात आहे.

एकूणच, धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, पुढील काही दिवसांत शासनाची भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.