ठाणे (14) : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि भारत सरकारच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या सहकार्याने महापालिकांमध्ये सिवरेज व सेप्टीक टँक स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी "नमस्ते" 'National Action for Mechnized Sanitation Ecosystem' हे ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपवर सिवरेज व सेप्टीक टँकची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जात असून शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांना या नमस्ते ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. आज कोपरी येथे या ॲपद्वारे ठामपाच्या 40 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली.
कोपरी सिवरेज प्लांट येथे आयोजित केलेल्या प्रोफाईलिंग शिबिराबाबत नमस्ते योजनेचे महाराष्ट्र समन्वयक सोपान कदम व प्रियांका गांगुर्डे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना नोंदणीसाठी सहकार्य केले. या ॲपच्या माध्यमातून स्वच्छता पध्दतीचे आधुनिकीकरण करणे, कौशल्य विकास वाढविणे आणि कामगार व त्यांच्या कुटुंबांचे कल्याण सुनिश्चित करणे याबाबतचे मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावत प्रशिक्षण, उद्योजकता वाढविणे, आर्थिक सहाय्य दणे तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसीद्वारे आरोग्य लाभ कसा मिळेल याबाबतचे मार्गदर्शन महापालिकेचे उपनगरअभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे यांनी केले. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी नमस्ते ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.