
ठाणे, दि. 9 : पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीतर्फे भाजपच्या नवनिर्वाचित आमदार माधवी संजय नाईक यांचा शनिवारी सन्मान करण्यात आला. सोसायटीचे विश्वस्त संजय दबडघाव यांनी आमदार माधवी नाईक यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झालेल्या माधवी नाईक यांनी ठाणे महापालिकेत १९९७ ते २००७ या काळात नगरसेवकपद भूषविले होते. ठाणे शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. ठाणे शहरात शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी शहरातील विविध शैक्षणिक संस्थांना सातत्याने पाठिंबा दिला. आमदार माधवी नाईक यांची विधान परिषदेवर निवड झाल्यामुळे शिक्षणसंस्थांना हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाला, या भावनेतून पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीतर्फे आज आमदार माधवी नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका माधुरी मेटांगे, भाजपच्या नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती.
या सत्काराबद्दल आमदार माधवी नाईक यांनी आभार मानले. तसेच सरस्वती एज्युकेशन सोसायटी चा हा सत्कार म्हणजे देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच ठाणे हे भविष्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार माधवी नाईक यांनी नमूद केले.